

नागपूर - नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी आधारे करण्यात आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती शिक्षण घोटाळ्यात आतापर्यंत कागदोपत्री तपासण्यात आलेल्या 622 पैकी केवळ 75 शिक्षकांची नियमानुसार तर उर्वरित 547 शिक्षकांची नियमबाह्य नियुक्ती झाल्याचे पुढे आले आहे. 15 ते 25 लाख रुपये घेतल्याचे बोलले जाते. किमान सरासरी प्रत्येकाकडून 20 लाख रुपये असा दर गृहीत धरला तरी 109 कोटी 40 लाख रुपयेपर्यंतचा या घोटाळ्याची व्याप्ती असल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत तत्कालीन शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजी नगर शिक्षण मंडळाच्या सचिवासह 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्यभरात गाजत असलेल्या या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आल्यानंतर झपाट्याने तपास पुढे जात असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 पासून बोगस आयडी तयार करीत शिक्षकांना बनावट नियुक्ती दिली गेली. 2019 ते 2025 पर्यंत हा घोटाळा सुरूच होता तत्कालीन उपसंचालकापासून अनेक जण या घोटाळ्यात गुंतलेले आहेत.
छत्रपती संभाजी नगर येथील शिक्षण मंडळाच्या सचिव व तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना प्रोडक्शन वॉरंटवर अटक करण्यात आली. एसआयटीने त्यांना न्यायालयात हजर केले असता 26 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. याशिवाय पूर्वीच एसआयटीच्या ताब्यात असलेले लक्ष्मण उपासराव मंघाम सोमवार 25 मे पर्यंत कोठडीत असून माजी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी 29 मे पर्यंत पोलीस कोठडीत आहेत.