

नागपूर : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात एक मोठी कारवाई समोर आली आहे. या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या शांती निकेतन शिक्षण संस्थेचे संचालक ओंकार अंजीकर यांच्या शाळांवर विशेष तपास पथकाने (SIT) छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या कारवाईत अनेक शिक्षक बोगस असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.
बाळाभाऊ पेठ येथील रहिवासी असलेले ओंकार भाऊराव अंजीकर (वय ४६) सध्या पोलीस कोठडीत आहेत. एसआयटीने त्यांच्या मालकीच्या गुलशनगर येथील जय हिंद विद्यालय, महात्मा फुले उच्च प्राथमिक शाळा आणि यादवनगर येथील एसकेबी उच्च प्राथमिक विद्या मंदिर या शाळांमध्ये तपासणी केली. प्राथमिक तपासात १८ पैकी ५ शिक्षकांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे आढळून आले आहे.
एसआयटीला मिळालेल्या माहितीनुसार, अंजीकर यांच्या शाळांमधील किमान ३५ शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे आणखी खोलवर पसरले असण्याची शक्यता असून, आगामी काळात आणखी काही ठिकाणी धाडी टाकल्या जाऊ शकतात. पोलीस तपासात असेही समोर आले आहे की, अंजीकर यांनी अद्याप फरार असलेल्या निलेश वाघमारे याच्या मदतीने हे बनावट आयडी तयार केले होते.