

नागपूर - शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आता शिक्षण संस्थाचालक,संचालकांवर कारवाई सुरू झाली आहे. जिल्ह्यातील विठ्ठल-रुख्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप धोटे यांना या प्रकरणात नुकतीच अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याच्या तपासात, प्रत्येक शिक्षकाकडून १५ लाख रुपये नोकरी लावण्यासाठी घेण्यात आल्याचे समोर आले असून, हे पैसे दिलीप धोटे यांनी घेतल्याचा एसआयटीला संशय आहे.
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी, वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यानेच या प्रकरणातील बनावट आयडी तयार केल्याचेही उघड झाले आहे. अटक करण्यात आलेले दिलीप धोटे हे मोहपा (ता. कळमेश्वर) येथील भाजप नेते आहेत हे विशेष. या संदर्भात शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासासाठी गठित विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्रमुख आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुनीता मेश्राम यांनी यासंदर्भात माहिती दिली.
आतापर्यंत शिक्षक भरती घोटाळ्यात ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बहुतांशी हे शिक्षण विभागातीलच अधिकारी आणि कर्मचारी असून काही नोकरीसाठी पैसै घेणारे दलाल देखील आहेत.