

नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यातील पाच आरोपींचा जामीन अर्ज सोमवारी सत्र न्यायाधीश जोगळेकर यांनी नाकारला. स्टेट बोर्डाचे संचालक चिंतामण वंजारी, नागपूरच्या माजी शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार, जिल्हा परिषदेच्या वेतन पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे, शिक्षक महेंद्र म्हैसकर, नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे लिपिक मंगाम यांचा जामीन अर्जदारांमध्ये समावेश आहे. दरम्यान नीलेश (अटकपूर्व) तर चिंतामण, वैशाली, महेंद्र व लिपिक मंगाम यांचा (नियमित) जामीन अर्ज नाकारला आहे. या शालार्थ आयडी घोटाळ्याची पोलीस, सायबर सेल आणि विशेष तपास पथकाकडून तपास सुरू आहे.
जेवनाळा, लाखनी येथील नानाजी पुडके विद्यालयाचे सचिव नानाजी पुडके (८८, रा. शारदा भवन, लाखनी, जि. भंडारा) यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. के. बनकर यांनी नियमित जामीन मंजूर केला. मुलगा पराग पुडके यांना मुख्याध्यापक करण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून शालार्थ आयडी प्राप्त केला आणि राज्य शासनाचे वेतन लाटले. दरम्यान पराग पुडके हे मुख्याध्यापकपदावरून सध्या निलंबित आहे. नानाजी पुडके यांना १० जून २०२५ रोजी करण्यात आलेली अटक ही गैरकायदेशीर असल्यामुळे व पोलिसांनी त्याच दिवशी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाला केली होती. अटक गैरकायदेशीर असल्यामुळे न्यायालयाने नानाजी पुडके यांना नियमित जामीन मंजूर केला. नानाजी पुडकेतर्फे अॅड. दीपेन जग्यासी, अॅड. विजय गुप्ता यांनी बाजू मांडली.
शालार्थ आयडी घोटाळ्यातील नागपूर शिक्षण विभागाचे माजी उपसंचालक सतीश मेंढे यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात मंगळवार, १७ जून रोजी सुनावणी होणार आहे. या शालार्थ आयडी घोटाळ्याने खळबळ उडाली असून या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.