

नागपूर - नागपूर विभागासह राज्यातील शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर, अनेक शालेय शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार मार्च २०२५ पासून थांबवण्यात आले आहेत. शालार्थ आयडी प्रकरणामुळे अनेक शिक्षक वेतनापासून वंचित असून, नाराज कर्मचारी आणि शिक्षकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नागपूरमध्ये वेतनवंचित कर्मचाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत सर्वांनी आपल्या अडचणी मांडल्या आणि एकत्र येऊन पुढील लढ्याची दिशा ठरवली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी माजी आमदार आणि शिक्षक नेते नागो गाणार यांची भेट घेतली. दोषी शिक्षकांवर कारवाई करा, पण इतर शिक्षकांचा पगार रोखू नका असे नागो गाणार यांनी या लढ्याला पाठिंबा देत सांगितले.
याप्रकरणी शिक्षकांनी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांचीही भेट घेतली. तपास सुरू ठेवा , पण निर्दोष शिक्षकांचे वेतन तात्काळ सुरू करा, अशी मागणी शिक्षकांनी पोलिस आयुक्तांकडे केली. पगार रखडल्यामुळे अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे संसार अडचणीत आले आहेत. त्यामुळे जर या महिन्यातही वेतन सुरू झाले नाही, तर सर्व कर्मचारी आणि शिक्षक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा शिक्षक पवन फरकुडे, निखिलेश पाटील यांनी यावेळी दिला.