

Nirmala Chitale Passed Away
नागपूर : राष्ट्रसेविका समितीच्या निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्त्या तसेच जनसंघाच्या कार्यात सक्रिय भूमिका बजावलेल्या निर्मला केशव चितळे यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्यासोबतच आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. या आंदोलनादरम्यान त्यांनी तुरुंगवासही भोगला.
निर्मला चितळे यांनी राष्ट्रसेविका समिती आणि जनसंघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. नवीन पिढीला उत्तम संस्कार मिळावेत, यासाठी त्यांनी बालकमंदिर संस्कार केंद्राच्या माध्यमातून सातत्याने कार्य केले. तसेच कोठी रोड येथील लक्ष्मीनारायण मंदिरात धार्मिक कार्यक्रमांसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग होता. संस्कारित आणि समाजाभिमुख पिढी घडविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
राष्ट्रसेविका समितीच्या ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती. सामाजिक, धार्मिक आणि राष्ट्रकार्याशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये त्यांनी आयुष्यभर योगदान दिले.
त्यांच्या पश्चात स्व. श्रीपाद केशव चितळे यांच्या परिवारासह श्रीकांत चितळे, भाग संचालक सोमलवाडा भाग, तसेच मुली किशोरी दाते, अपर्णा नरवणे, सुना शरयू चितळे, सूचित्रा चितळे, निलिमा यांच्यासह नातवंडे, पतवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.
गंगाबाई घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निर्मला चितळे यांच्या निधनाने सामाजिक, धार्मिक आणि राष्ट्रकार्याच्या क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.