Nagpur News | ‘आपली बस’ कंत्राटी कामगारांच्या मागण्यांना अखेर हिरवा कंदील!

बेमुदत संपाच्या इशाऱ्यापूर्वीच तोडगा; चालक-वाहकांसह इतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय
Nagpur News | ‘आपली बस’ कंत्राटी कामगारांच्या मागण्यांना अखेर हिरवा कंदील!
Published on
Updated on

नागपूर : नागपूर येथील मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांवर अखेर तोडगा निघाला आहे. परिवहन सभापती मंगला ताई खेकरे यांच्या नेतृत्वाखाली 1 सप्टेंबर रोजी झालेल्या तातडीच्या बैठकीत संघटनेच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 3 सप्टेंबरपासून पुकारण्यात येणाऱ्या प्रस्तावित बेमुदत संपापूर्वीच कामगारांच्या मागण्यांना हिरवा कंदील मिळाला आहे.

मा. प्रवीण भाऊ दटके यांच्या नेतृत्वाखाली मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघटनेने 3 ऑक्टोबर 2024 रोजी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. या आंदोलनानंतर 14 ऑक्टोबर 2024 रोजी अधिसूचना जारी करून काही मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र, या अधिसूचनेचा लाभ केवळ चालक आणि वाहकांनाच देण्यात आला. इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नव्हता. तसेच वाहकांना घरभाडे भत्त्याचा लाभही लागू करण्यात आलेला नव्हता.

या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रवीण भाऊ दटके आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 4 फेब्रुवारी 2025 रोजी महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर 12 मे 2025 रोजी प्रवीण भाऊ दटके यांच्या नेतृत्वाखाली मनपात बैठक घेण्यात आली. या बैठकीत इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासह वाहकांच्या घरभाडे भत्त्याच्या प्रश्नावर चर्चा झाली.

त्यानंतर संघटनेने सातत्याने पत्रव्यवहार, बैठका आणि सभा घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. 15 जुलै 2026 रोजी प्रवीण भाऊ दटके यांच्या उपस्थितीत आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, निर्णय होऊनही महिनाभर उलटून गेल्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नसल्याने संघटनेने अखेर 3 सप्टेंबर 2026 पासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर 1 सप्टेंबर रोजी परिवहन सभापती मंगला ताई खेकरे यांच्या नेतृत्वाखाली तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत कामगार संघटनेच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर संघटनेच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संपाची वेळ येण्यापूर्वीच प्रशासन आणि कामगार संघटनेमध्ये तोडगा निघाला आहे.

बैठकीनंतर संघटनेचे नागेश भाऊ सहारे यांनी महापौर नीता ताई ठाकरे, सत्तापक्ष नेते बाल्या भाऊ बोरकर, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी ताई दानी आणि परिवहन सभापती मंगला ताई खेकरे यांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news