Nagpur Politics | अखेर बंडखोर राजेंद्र मुळक यांना काँग्रेसचा ' हात !
राजेंद्र उट्टलवार
नागपूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत रामटेक विधानसभा मतदारसंघात उबाठा अर्थात महाविकास आघाडी उमेदवाराच्या विरोधात निवडणूक राजेंद्र मुळक यांनी निवडणूक लढली होती. आता माजी राज्यमंत्री जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यावरील निलंबन कारवाई मागे घेत काँग्रेस हाय कमांडने त्यांना अखेर मदतीचा हात दिला आहे. गेले काही दिवस मुळक यांच्या घरवापसीची चर्चा नागपूर जिल्ह्यात होती.
काटोल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार डॉ श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवलक्य जिचकार यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लढविली. दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी आणि बंडखोर दोघेही पराभूत होत महायुतीला फायदा झाला. अलीकडेच याज्ञवलक्य जिचकार यांना निलंबन मागे घेत पक्ष प्रवेश दिला गेला. तेव्हापासूनच मूलक यांच्या पक्षात परत येण्याची समर्थकांना उत्सुकता होती.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बाबा आष्टणकर यांच्याकडे सूत्रे सोपविली गेली असली तरी रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार यांचा उघडपणे राजेंद्र मूलक यांनाच पाठिंबा होता. अनेक बैठकांना त्यांनी हजेरी लावल्याने ही निलंबन कारवाई नावापुरतीच असल्याची विरोधकांची टीका सुरू होती. मध्यंतरी ते भाजपच्या वाटेवर असल्याचीही चर्चा रंगली मात्र त्यांनीच स्वतः ती फेटाळली. अखेर आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय राजेंद्र मूळक यांना काँग्रेसने हात दिला आहे. जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दृष्टीने सध्या डॅमेज कंट्रोलवर काँग्रेसतर्फे भर दिला जात आहे. अर्थातच पक्षात प्रवेश मिळाला आता पुन्हा जिल्हा अध्यक्ष पद मिळणार का, याकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.

