

Nagpur Police Commissionerate
नागपूर : नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात उत्कृष्ट तपास आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुरावा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस भवन येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते गुणवंत पोलिसांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रांनी सज्ज होऊन हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक रणजीत माजगावकर, पोलीस हवालदार अंकुश राठोड आणि पोलीस अंमलदार आशीष बावणकर यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्यामुळे एका प्रकरणात आरोपींविरुद्ध दोषसिद्धी झाली असून न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या कामगिरीबद्दल पोलीस हवालदार नितीन शिरसाठ आणि गुरुदास ताडपल्लीवार यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
याशिवाय कोतवाली पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष बोयने, न्यायालयीन पाठपुरावा अधिकारी फौजदार प्रमोद यावले आणि गणेश डफ यांच्या उत्कृष्ट कामगिरीचेही पोलीस आयुक्तांनी कौतुक केले.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व सन्मानित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत गुन्ह्यांचा दर्जेदार तपास आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्याच्या माध्यमातून दोषींना शिक्षा मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.