Nagpur Fake Gold Loan Fraud | बनावट सोने तारणावर 'आयसीआयसीआय' बँकेला २३ कोटींचा गंडा

मुख्य आरोपी सचिन राऊतला अटक; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Nagpur ICICI Bank Gold Loan Scam
Nagpur ICICI Bank Gold Loan ScamAI Photo
Published on
Updated on

Nagpur ICICI Bank Gold Loan Scam

नागपूर : आयसीआयसीआय बँकेच्या विविध शाखांमध्ये बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून तब्बल २३ कोटी रुपयांचे गोल्ड लोन उचलल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन राऊत याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. बनावट दागिने तारण ठेवून विविध व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करून घेण्यात राऊतची महत्त्वाची भूमिका असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

नऊ शाखांमध्ये बनावट सोन्याचा खेळ

नागपूर शहरातील आयसीआयसीआय बँकेच्या नऊ शाखांमध्ये बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून मोठ्या प्रमाणात गोल्ड लोन घेण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या गैरव्यवहारामुळे बँकेचे सुमारे २३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील संशयित गोल्ड लोन खात्यांची संख्या मोठी असून, संबंधित खातेधारकांचीही चौकशी केली जात आहे.

Nagpur ICICI Bank Gold Loan Scam
Nagpur news: रस्त्यावरील अतिक्रमणांवर नागपुरात ‘ॲक्शन’; महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

बनावट ग्राहकांचे जाळे उभारल्याचा आरोप

तपासानुसार, सचिन राऊत याने विविध व्यक्तींच्या नावाने गोल्ड लोन मिळवून देण्यासाठी यंत्रणा उभी केल्याचा आरोप आहे. बँकेतील काही अधिकारी, सोन्याचे मूल्यांकन करणारे अधिकारी तसेच तपासणीशी संबंधित व्यक्तींच्या संगनमतातून बनावट दागिन्यांना खरे सोने असल्याचे दाखवून कर्ज मंजूर करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जाची रक्कम उचलण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.

ऑडिटमध्ये उघड झाला गैरव्यवहार

मनिषनगर शाखेतील गोल्ड लोन खात्यांच्या अंतर्गत तपासणीदरम्यान काही तारण दागिने बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर बँकेने इतर शाखांमधील गोल्ड लोन खात्यांचीही तपासणी सुरू केली. या व्यापक तपासणीत नऊ शाखांमध्ये बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेतल्याचे प्रकार समोर आले.

या प्रकरणात यापूर्वी बँक व्यवस्थापक, सोन्याचे मूल्यांकन करणारे अधिकारी, तपासणी अधिकारी यांच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासाचा विस्तार करत आर्थिक गुन्हे शाखेने आता मुख्य आरोपी सचिन राऊत याला अटक केली आहे.

Nagpur ICICI Bank Gold Loan Scam
Temple news nagpur: कल्याणेश्वर मंदिराच्या विकास आराखड्याला मान्यता

पैशांचा प्रवास तपासणार

आर्थिक गुन्हे शाखेकडून गोल्ड लोनची रक्कम कोणत्या खात्यांमध्ये जमा झाली, त्यानंतर ती कुठे वळवण्यात आली आणि या आर्थिक व्यवहारांचा आरोपींशी नेमका काय संबंध आहे, याचा तपास केला जात आहे. कर्ज अर्ज, बँक कागदपत्रे, सोन्याचे मूल्यांकन अहवाल, खाते व्यवहार आणि अन्य पुराव्यांची छाननी सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना बँकेतील आणखी संबंधित व्यक्ती तसेच या आर्थिक जाळ्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news