

Nagpur Parking Dispute Video: नागपूरमध्ये वाहनाच्या पार्किंगच्या वादातून धक्कादायक घटना घडली आहे. पार्किंगच्या कारणावरून एका स्थानिक नागरिकाचा दुकानदारासोबत वाद झाला. हा वाद इतका वाढला की, संतापलेल्या व्यक्तीने थेट तलवार बाहेर काढली. या तलवारीने दुकानदाराला धमकावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नागपुरातील एका परिसरात वाहन पार्किंगवरून स्थानिक रहिवासी आणि दुकानदार यांच्यात वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला त्यानंतर काही वेळातच वाद वाढला. संबंधित व्यक्तीने तलवार बाहेर काढून दुकानदाराला धमकावण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती हातात तलवार घेऊन दुकानदाराला धमकावताना दिसत आहे. त्याने दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेली एक महिला आणि इतर काही नागरिक या दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. सुदैवाने, हा वाद प्रत्यक्ष मारहाणीपर्यंत पोहोचला नाही.
नागपूरमधील या घटनेच्या काही दिवस आधी हरियाणातील फरिदाबादमध्येही पार्किंगच्या वादातून एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेत टेक महिंद्रा कंपनीचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष परमजीत धानखड यांचा मृत्यू झाला होता. ते आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी सिंगापूरहून भारतात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोनू शर्मा याने पार्किंगच्या मुद्द्यावर चर्चा करण्याच्या बहाण्याने परमजीत यांना घराबाहेर बोलावले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात परमजीत यांचा मृत्यू झाला.
या घटनेचा व्हिडिओही समोर आला होता. त्यामध्ये गोळीबार होण्यापूर्वी दोघांमध्ये झालेला संवाद दिसत आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. नागपूर आणि फरिदाबादमधील या दोन्ही घटनांमुळे वाहन पार्किंगसारख्या किरकोळ कारणावरून होणारे वाद किती गंभीर रूप घेऊ शकतात, हे यातून दिसून येतं.