

नागपूर : शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा एकतर्फी प्रेमातून जीव घेणारा हल्ला झाल्याने नागपूर हादरले आहे. अशोक चौक परिसरात १७ वर्षीय आयटीआयमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका युवकाने हातोडा आणि कटरने वार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी घडला असून पोलिसांनी आरोपी सूरज कृष्णाप्रसाद शुक्ला (वय 26), रा. इमामवाडा याला अटक केली आहे.
अल्पवयीन मुलगी आयटीआयमध्ये शिक्षण घेत असून सूरज शुक्ला हा मनपामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतो. सूरजला तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. तो गेल्या काही महिन्यांपासून तिचा सतत पाठलाग करत होता.मुलीने नकार दिल्यानंतरही सूरज तिला वारंवार त्रास देत असल्याने मुलगी आणि तिच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेच्या दोन दिवस आधीही सूरजने तिचा पायी जात असताना पाठलाग केला. “तू मला आवडतेस… मी तुझ्यावर प्रेम करतो… तू माझ्यावर प्रेम करते का?” असे विचारून तिचा मानसिक त्रास वाढवला. मुलीने याबद्दल घरी पालकांना सांगितल्यानंतर तिचे आई-वडील सूरजच्या घरी गेले व त्याला समज दिली. त्याने पुन्हा त्रास देणार नसल्याचे आश्वासन दिले. पण हे आश्वासन फक्त दिखावा ठरले.
मुलीने आपल्या आई-वडिलांना सर्व सांगितल्यामुळे सूरज चिडला. सोमवारी सकाळी ती पायी जात असताना अशोक चौक परिसरात त्याने तिचा पुन्हा पाठलाग केला. तिचा मार्ग अडवून फिल्मी स्टाईलमध्ये तो म्हणाला, "तू माझी नाही तर कोणाचीच होणार नाहीस!" एवढे बोलून त्याने अचानक हातातील हातोड्याने तिच्या डोक्यावर वार केला. मुलगी खाली कोसळताच त्याने गळ्यावर कटरने वार केले.
मुलीच्या आक्रोशानंतर रस्त्यावरचे नागरिक मदतीसाठी धावले. लोक जमत असल्याचे पाहून सूरज तेथून पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेतील मुलीला तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्या डोक्यावर आणि गळ्यावर खोल जखमा असून उपचार सुरू आहेत.
मुलीच्या आई-वडिलांनी लगेच इमामवाडा पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपी सूरज अटकेच्या भीतीने लपून बसला होता आणि अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. जामीन न मिळाल्यानंतर सूरजने अखेर पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्येही प्रचंड चिंता आहे. यापूर्वी अजनी परिसरातही एकतर्फी प्रेमातून खूनाची घटना घडली होती. त्यामुळे नागपुरात अशा घटनांची मालिका वाढत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.