

नागपूर - वारंवार समजूत घालूनही पत्नी कोणाशीतरी रात्रीबेरात्री सतत मोबाईलवरून बोलत असल्याने चारित्र्यावर संशय घेत रागाच्या भरात त्याने तिच्या कानशिलात हाणली. पत्नीनेही पतीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. सुनील नारायण यदुवंशी (वय २६) असे आरोपीचे तर राणी सुनील यदुवंशी (वय २२) असे मृतक पत्नीचे नाव आहे.
सुनील यदुवंशी याचा दोन वर्षांपूर्वीच राणीशी विवाह झाला. तो पत्नीसह मानकापूर रिंग रोडवरील न्यू गांधी ले-आऊटमधील दावत लॉन शेजारी राहत होता. सुनील हा केटरिंगचा व्यवसाय करत होता आणि रिकाम्या वेळात टॅक्सी चालवत होता.
पत्नी नेहमी कोणाशीतरी मोबाईलवर बोलत असल्याची बाब त्याला खटकत होती. मृत राणीचे वडील तुलाराम रामपाल यादव (वय ४६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला. पती सुनीलने तिचा आकस्मिक मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र, शवविच्छेदन अहवालातात राणीचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. हत्येचा गुन्हा सिद्ध होताच पोलिस उपनिरीक्षक पोकरकर यांनी आरोपी पती सुनिल यदूवंशीविरूद्ध गुन्हा दाखल करून तत्काळ अटक केली.