

नागपूर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांनी लढायच्या असतात. त्यामुळे स्वबळावर लढायचे की महायुती म्हणून लढायचे, याबाबतचे सर्व अधिकार वरिष्ठांनी स्थानिक पातळीवर दिले होते. नागपूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भाजपा मजबूत असल्याने अनेक ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारांची पळवापळव एक-दोन ठिकाणी झाली असली, तरी बाकी सर्व ठिकाणी पक्षाचेच कार्यकर्ते निवडणुकीत रिंगणात आहेत, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
शालार्थ आयडी घोटाळा
शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता राज्यस्तरीय एसआयटी गठीत करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. मात्र, कोणाचा दोष नसताना त्यांचे पगार अडले असतील, तर त्यांना तातडीने पगार देण्याचे निर्देश दिले जातील,” असेही त्यांनी स्पष्ट केले. लाडक्या बहिणींना इ केवायसी पूर्ण करण्यासाठी कालावधी कमी पडत असेल, तर त्यावर नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल,अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान,मेळघाट बालमृत्यूकडे लक्ष वेधले असता,
मेळघाटातील मृत्यूंसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे भोयर म्हणाले.दरम्यान,अमोडिया कंपनी प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. त्या समितीमार्फत पुढील कार्यवाही केली जाईल,” अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
ठाकरे बंधू युतीची धडपड
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा मनसे या दोन्ही पक्षांचा जमिनीवर आता बेस राहिलेला नाही. मतदार त्यांच्याबरोबर नाहीत. त्यामुळेच त्यांना सर्वच निवडणुकांत अपयश येत आहे. किमान एकत्र लढल्यास काही उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे का, याची चाचपणी दोन्ही बंधूंकडून सुरू असल्याचे भोयर म्हणाले.