

नागपूर: महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपूर शहरातील नंदनवन परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका कुख्यात गुंडाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना शनिवारी (दि.२५) उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन येथील आरोपींनी बिडगाव येथील एका लॉजवर या पीडित मुलीवर अत्याचार केला. एवढेच नव्हे, तर या विकृत कृत्याचा त्यांनी व्हिडिओदेखील तयार केला असल्याची माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत करण कव़डू रामटेके आणि रोहित सोनवाने (रा. चंद्रानगर, प्रजापति नगर) या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी करण रामटेके याच्यावर यापूर्वीच चोरी, मारहाण आणि दंगल यांसारखे गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा आरोपी रोहित याच्यावरही पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत याआधी गुन्हे नोंदवलेले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या या दोन नराधमांनी केलेल्या कृत्यामुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे.