

नागपूर: बनावट कागदपत्रे आणि आधार कार्डचा गैरवापर करून एका बिल्डरने नागपूरचे माजी पोलीस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय यांची कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी बिल्डर प्रवीण वालदे याच्याविरोधात फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
जुना बगडगंज, दादा धुनीवाले चौक येथील रहिवासी असलेल्या प्रवीण वालदे या बिल्डरने डॉ. अंकुश धनविजय यांच्या मालकीच्या मौजा वागदरा, गुमगाव येथील चार एकर जमिनीवर डोळा ठेवला. ही जमीन निवासी (रेसिडेन्शियल) झोनमध्ये असतानाही, बिल्डर वालदे याने डॉ. धनविजय यांची भेट घेऊन, 'ही जमीन अजूनही शेतीचीच आहे' असे भासवले. या जमिनीच्या मोबदल्यात, बिल्डरने डॉ. धनविजय यांना रु. ३६ लाख किमतीचा तीन बीएचके फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले.
या आश्वासनानंतर मार्च २०२३ मध्ये या संदर्भातील कागदोपत्री व्यवहार पूर्ण करण्यात आला. बिल्डरने लगेचच या जमिनीवर अपार्टमेंट बांधायला सुरुवात केली आणि करारात अडीच वर्षांत फ्लॅटचा ताबा देण्याचे नमूद केले होते. मात्र, ठरलेली मुदत संपूनही डॉ. धनविजय यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. यामुळे संशय आल्याने डॉ. धनविजय यांनी संबंधित विभागाकडे चौकशी केली. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. बिल्डर प्रवीण वालदे याने डॉ. धनविजय यांचे नाव आणि पत्त्याचा गैरवापर केला होता. इतकेच नाही तर बनावट आधार कार्डचा वापर करून हा संपूर्ण व्यवहार करण्यात आला. विशेष म्हणजे, ज्या जमिनीच्या बदल्यात फक्त ३६ लाखांचा फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते, त्या जमिनीची मूळ किंमत दोन कोटी ५९ लाख ८८ हजार रुपये असल्याचे डॉ. धनविजय यांच्या निदर्शनास आले.
या गंभीर फसवणुकीनंतर डॉ. अंकुश धनविजय यांनी तात्काळ हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बिल्डर प्रवीण वालदे याच्याविरुद्ध फसवणूक आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. एका माजी उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याचीच फसवणूक झाल्याने नागपुरात खळबळ उडाली आहे.