

नागपूर : अजनी परिसरात शुक्रवारी (दि. २९) एकतर्फी प्रेमातून दहावीतील विद्यार्थिनी एंजल हिची छातीवर चाकूचे वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना ती शाळेतून मैत्रिणीसोबत घरी जात असताना घडली.
हत्या झाल्यानंतर एंजलचा मृतदेह मेडिकल कॉलेजच्या शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला होता. मात्र, तिचे तीन नातेवाईक शुक्रवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत तेथे गेले. त्यांनी दोन दरवाज्यांवरील कुलुपे तोडून आत शोधाशोध केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. काही वेळातच ते तिघे पसार झाले. मेडिकल प्रशासनाने घटनेची तक्रार नोंदवून मृतदेह स्टोरेजमध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणामुळे मेडिकलच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, आरोपी युवकाला पोलिसांनी गंगाबाई घाट परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. विद्यार्थिनीने आपल्याला टाळून दुसऱ्याशी जवळीक साधल्याच्या रागातून त्याने ही हत्या केल्याचे समोर आले.
आरोपीने ऑनलाईन चाकू खरेदी करून योग्य संधीची वाट पाहिली. शुक्रवारी (दि.२९) त्यानेच हल्ला करून घटनास्थळी चप्पल व मोटरसायकल टाकून अजनी हॉकी ग्राउंडच्या दिशेने पलायन केले. त्यानंतर रक्ताने माखलेले कपडे आणि मोबाईल जाळून टाकले व नातेवाईकाकडे आश्रय घेतला. मात्र, दुसरे कपडे घालून दुचाकीने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला पकडले. शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.