

Nagpur Municipal Election 2026
नागपूर: येथील रेशीमबाग वार्ड(प्रभाग क्रमांक ३१)मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचे निवडणूक कार्यालय अज्ञातांनी जाळले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या कृत्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे.
यासंदर्भात 'पुढारी न्यूज'चे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाणे यांनी सांगितले की, काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचे कार्यालय रेशीमबाग वॉर्डात (प्रभाग क्रमांक ३१)आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत (अडीच वाजेपर्यंत) कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते. कार्यकर्ते घरी परतल्यानंतर काही अज्ञातांनी या कार्यालयाला आग लावली. या आगीत कार्यालयाचा मंडप, कुलर आणि इतर महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले आहे.
ज्या ठिकाणी हे कार्यालय आहे, त्या परिसरात पतंगांची मोठी दुकाने आहेत. सध्या मकर संक्रांतीचा काळ असल्याने मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य तिथे उपलब्ध होते. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत ती विझवली. नागरिकांच्या या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रभागात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे.भाजपचे उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पराभवाच्या भीतीने भाजपनेच हे कृत्य घडवून आणले असावे, असा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.