

NMC Election Results 2026
नागपूर : येत्या 15 जानेवारी रोजी 38 प्रभागांत 151 नगरसेवकांसाठी होणाऱ्या नागपूर मनपा निवडणुकीसाठी शहरातील 3004 मतदान केंद्र सज्ज झाले आहेत. 24 लाख 83 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 14 रोजी चार हजार नऊ कंट्रोल युनिट आणि दहा हजार 928 बॅलेट युनिट स्ट्रॉंग रूम मधून मतदान केंद्रापर्यंत पोहोचणार आहेत. बहुतांशी ईव्हीएम या विदर्भातीलच निवडणुकीत वापरलेल्या आहेत. दहा टक्के अतिरिक्त ईव्हीएम राखीव ठेवण्यात आलेल्या असल्याची माहिती मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांनी पत्रपरिषदेत दिली.
मतदानानंतर रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम स्ट्रॉंग रूम पर्यंत रात्री उशिरा परत येतील आणि लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी असल्याने यंत्रणेची देखील कसोटी लागणार आहे. या निवडणुकीसाठी मनपाच्या वतीने ' व्होट पाथ ' असे ॲप विकसित करण्यात आले आहे. 16 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल. पहिला निकाल साधारणतः एक वाजेपर्यंत अपेक्षित आहे. एकाच वेळी पोस्टल आणि ईव्हीएमची मतमोजणी केली जाणार आहे. पोलीस बंदोबस्त आणि निवडणूक अधिकारी कर्मचारी असे 16 हजारावर मनुष्यबळ यासाठी लागणार आहे
ज्येष्ठ मतदानापासून वंचित मनपा निवडणुकीत एकेका मताचे महत्त्व असताना यावेळी वयोवृद्ध, जेष्ठ नागरिक मात्र आपल्या घरून मतदानाचा हक्क विधानसभा निवडणुकीप्रमाणे बजावू शकणार नाहीत. निवडणूक आयोगामार्फत यासंबंधीच्या सूचना नसल्याची माहिती अभिजीत चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. विशेष म्हणजे या संदर्भात विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले. मात्र आयोगाने याकडे दुर्लक्ष केले. या न होणाऱ्या मतदानाचा परिणाम काही ठिकाणी निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
मनपा निवडणुकीत नामांकन अर्ज भरण्याच्या धावपळीत तीन-चार अपत्य असलेल्या उमेदवारांकडूनही नामांकन अर्ज स्वीकृत करण्यात आल्याच्या मुद्द्यावर लक्ष वेधले असता या संदर्भात आपण संबंधिताना अहवाल मागितला असून त्यानंतरच बोलता येईल. यात न्यायालयात जाता येईल असे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले. रात्री उशिरापर्यंत नामांकन प्रक्रिया चालली आणि लागलीच पडताळणी प्रक्रिया होती असे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला