

नागपूर - नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील प्रत्येक झोनमध्ये एक मतदान केंद्रात सर्व निवडणूक प्रक्रिया महिला कर्मचारी सांभाळणार आहेत. या मतदान केंद्रांना पिंक बुथ संबोधले जाणार आहे. प्रत्येक झोनमध्ये एक मतदान केंद्रात सर्व सुविधा प्रदान केल्या जाणार असून, या मतदान केंद्रांना आदर्श बुथ संबोधले जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील १० झोनमध्ये एक पिंक बुथ व एक आदर्श बुथ उभारण्यात येणार आहे. शहरातील मतदानाचे प्रमाणे वाढावे तसेच महिलांचे मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत.
पिंक बुथमध्ये निवडणूकीची सर्व प्रक्रिया केवळ महिला कर्मचारी सांभाळणार आहेत. या मतदान केंद्रांमध्ये गुलाबी रंगाचे फुगे लावून सजविले जाणार आहे. त्याचप्रमाणे गुलाबी रंगाचे फलक राहणार आहेत. आदर्श बुथमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रात रॅम्प, व्हील चेअरची सुविधा राहणार आहे. हे बुथ फलकांनी सजविले जाणार आहे. प्रत्येक झोनमध्ये एक आदर्श बुथ राहणार आहे.