

नागपूर : महापालिका निवडणुकीत नवर्याने भाजपविरोधात दंड थोपटताच माजी महापौर राहिलेल्या पत्नीने नांदते घर सोडल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. पक्षनिष्ठेशी संबंधित या घटनेची पंचक्रोशीत खमंग चर्चा रंगली आहे.
सध्या माजी महापौर अर्चना डेहनकर नागपुरातच आपल्या भावाच्या घरी म्हणजेच आपल्या माहेरी राहत आहेत. जोवर पती विनायक डेहनकर भाजपविरोधात बंड म्यान करत नाही, तोवर मी घरी परतणार नाही असा निर्धार अर्चना डेहनकर यांनी केला आहे. एवढेच नाही तर पती विनायक डेहनकर आपल्या बंडखोरीवर कायम राहिले, तर नागपुरातील विविध प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार करेन, पण पतीच्या प्रचाराला मुळीच जाणार नाही, असेही अर्चना डेहनकर यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपने नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या मनोज साबळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहरनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला आहे. यामुळे अर्चना डेहनकर यांच्यापुढे पक्षनिष्ठा व पतीची भूमिका यापैकी कुणाच्या मागे उभे राहायचे? असे धर्मसंकट उभे राहिले. त्यात त्यांनी पक्षनिष्ठेला सर्वोच्च स्थान देत या निवडणुकीत भाजपने दिलेल्या उमेदवाराचाच प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.