

नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख माजी मंत्री भास्कर जाधव यांनी सर्व १५१ जागांवर लढण्याचे संकेत देत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने स्वबळासाठी दंड थोपटले आहे.
रवी भवन येथे आयोजित बैठकीत त्यांनी इच्छुक कार्यकर्त्यांना तातडीने आपले बायोडाटा पक्षाकडे सादर करण्याचे आवाहन केले. तसेच, "निवडणुकीच्या तयारीला लागा. आम्ही योग्य ते नियोजन करू. तुम्हीही नियोजनबद्ध काम करा. पक्षाकडून वेळोवेळी आवश्यक ती मदत दिली जाईल," असे स्पष्ट आश्वासनही त्यांनी दिले.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महापालिका निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वतंत्रपणे, याबाबत पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीच्या चर्चाही सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच भास्कर जाधव यांच्या विधानाला राजकीयदृष्ट्या महत्त्व आले आहे.