

Dr Sameer Paltewar arrest
नागपूर: अखेर आर्थिक गुन्हे शाखेने १७ कोटींच्या मेडिट्रिना हॉस्पिटल घोटाळ्याप्रकरणी व्यवस्थापकीय संचालक डॉ. समीर पालतेवार यांना तब्बल १८ दिवसां नंतर अटक केली आहे. त्यामुळे मेडिट्रिना हॉस्पिटल घोटाळाप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मदत होणार असून तपासाला गती येणार आहे.
एक दिवसापूर्वी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. धुळधुळे यांनी दिलेल्या निरीक्षणात स्पष्ट नमूद केले की डॉ. समीर पालतेवार यांनी इतर १३ जणांसह अनेक शेल कंपन्या स्थापन करून मेडिट्रिना हॉस्पिटलमधून निधी वळविला. न्यायालयाने सर्व १३ आरोपींचा अंतरिम जामीन अर्जही फेटाळला.
यापूर्वी, २३ सप्टेंबर २०२५ रोजी, या आरोपींचा अंतरिम अटकपूर्व जामीन देखील फेटाळण्यात आला होता. १७ सप्टेंबर २०२५ रोजी, आर्थिक गुन्हे शाखेने सिताबर्डी पोलिस ठाण्यामार्फत डॉ. समीर पालटेवार, पत्नी सोनाली आणि इतर १६ जणांविरुद्ध पाचवा गुन्हा दाखल केला.
मेडिट्रिना हॉस्पिटलचे सह-संस्थापक गणेश चक्करवार यांनी केलेल्या तक्रारीनुसार, सन २०२० ते २०२४ दरम्यान बनावट कन्सल्टन्सी आणि मार्केटिंग बिलांच्या माध्यमातून सुमारे १६.८३ कोटींचा निधी हॉस्पिटलच्या खात्यांतून वळविण्यात आला.
दरम्यान, नागपूर महानगरपालिका देखील मेडिट्रिना हॉस्पिटलच्या विविध नियमभंगांच्या तपासात गुंतली आहे. अग्निशमन विभागाने हॉस्पिटलची इमारत अग्निसुरक्षेअभावी धोकादायक घोषित केली आहे. आरोग्य विभागाने हॉस्पिटलची आयपीडी परवानगी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.