

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारावेळी काटोल नरखेड मतदारसंघात झालेला हल्ला हा बनाव असल्याचा दावा नागपूर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ‘B Final Report’ न्यायालयात सादर केली आहे.
यामध्ये पोलिसांनी म्हटलंय की, जर दगड खरोखर मारला गेला असता, तर तो कारच्या मागच्या किंवा मधल्या सीटवर पडला असता. मात्र प्रत्यक्ष घटनेच्या वेळी दगड पुढील सीटवर होता. या विसंगतीमुळे हा प्रकार बनावट असल्याचे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
काटोल येथे अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणातील फॉरेन्सिक तपासणी अहवालात देखील कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा गुन्हा सिद्ध होत नसल्याचे ते म्हणाले, असे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
ही घटना १८ नोव्हेंबर २०२४ रोजी घडल्याचे सांगण्यात आले होते. त्या वेळी अनिल देशमुख काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. त्यांनी आपल्या कारवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. यानंतर स्वतः देशमुख यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून हल्ल्याची माहिती लोकांसमोर आणली होती. मात्र तपासानंतर पोलिसांनी सादर केलेल्या अहवालामुळे या कथित हल्ल्याची सत्यता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.