

Girlfriend Murder Case Nagpur
नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेची हत्या करून तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सचिन पेंडोर याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच महिलेच्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी त्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षाही ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. मुंगळकीर यांनी हा निकाल दिला.
सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, सचिन पेंडोर याचे संबंधित महिलेशी प्रेमसंबंध होते. मात्र, महिलेने आरोपीसोबतचे संबंध तोडून पुन्हा पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तिचा पती तिला माहेराहून घरी नेण्यासाठी आला होता.
घटनेच्या रात्री महिला आणि तिचा पती तिच्या आई-वडिलांच्या घरी झोपले असताना आरोपी धारदार टिकास घेऊन तेथे आला. त्याने दोघांवरही हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. जखमी पतीने आरोपीची ओळख पटविली.
या प्रकरणी मृत महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान मृत महिलेची आई आणि बहीण यांच्या साक्षीही न्यायालयाने ग्राह्य धरल्या. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी सचिन पेंडोर याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.