

नागपूर - शिक्षिका म्हणून कर्तव्यावर असलेल्या समीरा फातिमा नामक एका महिलेने एक दोन नव्हे तर चक्क आठ, नऊ पुरुषांसोबत लग्न केले. अल्पावधीतच त्यांच्या विरोधात बलात्कार, हुंडाबळी, मारहाण आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करीत त्यांच्याकडून संपत्ती, कोट्यवधी रुपये उकळण्याची घटना पुढे आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील न्यू कामठी या एकाच पोलीस स्टेशन अंतर्गत हे सर्व गुन्हे दाखल झाले असून आणखी अनेक लोकांना तिने याच प्रकारे आपल्या मोहपाशात अडकवले असल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे फसवणुकीचा हा आकडा देखील तीन ते चार कोटी असा मोठा असण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे यात लग्न लावणाऱ्या मौलवीपासून तर पोलीस, वकील आणि तिचे आई, काका. मामा असे काही कुटुंबीय या सगळ्यांचा सहभाग प्रत्येक लग्नात असल्याचे या पीडित पुरुषांनी आरोप केले असल्याने यातील टोळी हुडकून काढण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. लग्नानंतर काही दिवस मजेत जातात मात्र ती नंतर आपले खरे रूप दाखवते आणि पुरुषांना ब्लॅकमेल करते अशा प्रकारची तिची फसवणुकीची पद्धत असल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये नागपूर,विदर्भच नव्हे तर थेट मुंबईपर्यंतचे व्यावसायिक आहेत. मुस्लिम समाजातील तरुणांचा यात अधिक समावेश आहे.