

पारडी शिवारात बिबट्या फिरत असल्याची चर्चा जोरात
आज पहाटे बिबट्याने दोनपेक्षा अधिक लोकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती
एकूण 7 नागरिक जखमी, भवानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
Nagpur Leopard Attack | नागपूर शहराच्या पारडी शिवार आणि कापसी परिसरात आज पहाटे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्या फिरत असल्याची चर्चा सुरू होती. दोन दिवसांपूर्वी कापसी भागात बिबट्याचे स्पष्ट दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले होते. त्यावेळी वनविभागाने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली, परंतु बिबट्या हाती लागला नव्हता.
आज पहाटे परिस्थिती अधिक गंभीर बनली. स्थानिकांच्या सांगण्यानुसार, पहाटे बिबट्याने सात लोकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून नंतर एकूण सात जण जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांना तातडीने भानुदास भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला आयसीयू मध्ये हलविण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. लोकांनी एकमेकांना सावध राहण्याच्या सूचना देत घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यास सुरुवात केली. बिबट्या परिसरात अजूनही फिरत असल्याची भीती असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.
पोलिस आणि वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरात बॅरिकेडिंग करून मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कामात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाने वारंवार आवाहन केले की नागरिकांनी अशा घटना स्थळी अनावश्यक गर्दी करू नये.
बिबट्याच्या हालचाली वाढत असल्याने वनविभागाने सापळे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रँक्विलायझर पथकही घटनास्थळी पोहोचले असून बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे
अंधारात घराबाहेर पडू नये
लहान मुले व ज्येष्ठांना एकटे सोडू नये
गुरेढोरे, पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी बांधावेत
संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ विभागाशी संपर्क साधावा
पारडी आणि कापसी परिसर नागपूर शहरालगत असल्यामुळे शहराजवळ वन्यप्राण्यांचा वावर गेल्या काही वर्षांत वाढल्याचे तज्ज्ञ सांगतात. जंगल क्षेत्रातील घट, अन्न-पाण्याचा अभाव आणि वाढती वस्ती हेही कारण म्हणून पुढे केले जात आहे. आजच्या घटनेनंतर वनविभाग आणि पोलिस दोन्ही पथकांनी शोधमोहीम तीव्र केली आहे. पुढील काही तास हे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.