

जळगाव: भडगाव तालुक्यातील लोन पिरचे येथील 50 वर्षीय शेतकरी विजय नारायण पाटील यांची कापूस मोजणीदरम्यान फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी निंभोरा आणि कोठली येथील दोन व्यापाऱ्यांविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय पाटील यांनी 6 ते 8 जानेवारीदरम्यान निंभोरा येथील राजेंद्र यशवंत पाटील आणि कोठली येथील नाना राजधर पाटील या व्यापाऱ्यांना कापूर दिला होता. कापूस मोजणीदरम्यान 29.89 क्विंटल कमी दाखवून शेतकऱ्याची तब्बल 2,30,306 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
व्यापाऱ्यांचा खोटेपणा उघड झाल्यानंतर त्यांनी पिकअप मालवाहतूक वाहन (क्रमांक MH 19 BM 2836) आणि वजनकाटा तिथेच सोडून पलायन केल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांनी संबंधित वाहन आणि वजनकाटा पोलिस ठाण्यात जमा करून तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील सोनवणे करीत आहेत.