

सिन्नर ( नाशिक ) : तालुक्यात रब्बीच्या पिकांचे 20 हजार 600 हेक्टरवर उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यंदा खरीप हंगामात शेतकर्यांनी मका पिकाला पसंती दिली होती. रब्बी हंगामातही परिस्थिती तशीच असल्याचे दिसून येते. कृषी विभागाच्या उद्दिष्टापेक्षा आताच मक्याची 25 टक्के जादा पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून दिसत आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांची उशिरा काढणी झाली. परिणामी रब्बी हंगामाला यंदा उशिरा सुरुवात झाल्याचे दिसून आले. तालुक्यातील नियोजित रब्बी क्षेत्र 20 हजार 627 हेक्टर असून, आतापर्यंत 13 हजार 637 हेक्टरवर रब्बीची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. रब्बी क्षेत्राच्या जवळपास 66 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून तालुक्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे गहू आणि हरभर्याच्या पेरणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. ही थंडी पिकांना पोषक आहे. तालुक्यात गव्हाचे 8 हजार 933 हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी आतापर्यंत 5 हजार 624 गव्हाची पेरणी पूर्ण झाली. उद्दिष्टापैकी 63 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. तालुक्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र दोन हजार 495 हेक्टर असून, त्यापैकी केवळ 751 हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. तालुक्यात हरभर्याचे 6 हजार 163 हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी 3 हजार 456 हेक्टरवर म्हणजेच 56 टक्के पेरणी झाली. सप्टेंबर, ऑक्टोबरमधील पावसामुळे गाव, शिवारातील तलाव, पाझर तलावआणि विहिरींमध्ये मुबलक जलसाठा झाला आहे.
तसेच तालुक्यातील धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. जमिनीतील पाण्याची पातळीही वाढल्यामुळे उन्हाळी पिकांसाठी शेतकर्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तालुक्यात गेल्या काही वर्षांत दुग्धोत्पादनाला चालना मिळाली असून, शेतीपूरक व्यवसायातून समृद्धी साधण्याला शेतकर्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे जनावरांच्या चार्यासाठी शेतकरी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत मक्याला पसंती देत असल्याचे चित्र आहे. मका कापल्यानंतर त्याची कुट्टी करून त्याची साठवणूक करण्यात येत असते. वर्षभराचा चारा साठवून ठेवण्याकडे शेतकर्यांचा कल दिसतो. दरम्यान, उर्वरित पेरण्या उरकण्यासाठी शेतकरी कामाला लागलेले दिसत आहेत.
कांदालागवडही वाढण्याची शक्यता
अवकाळी पावसाने यंदा कांदा रोपांचे नुकसान झाले. मात्र, तरीही शेतकर्यांकडून कांदा रोपे टाकण्यात येत असून, काही भागांत कांदालागवडीला सुरुवात झाली आहे. रोपे उशिरा तयार झाली असली, तरी यंदा सर्वत्र विहिरींना मुबलक पाणीसाठा असल्याने कांदालागवडीकडे कल वाढल्याचे दिसते. त्यामुळे तालुक्यात कांदालागवडीतही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मंजूरटंचाईने शेतकरी त्रस्त
पावसाळ्यानंतर मका, बाजरी, ज्वारी, सोयाबीन सोंगणीसाठी त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यातील शेकडो मजूर तालुक्यातील विविध भागांत येत असतात. या काळात शेतकर्यांना मजुरांची टंचाई भासत नाही. मात्र, दिवाळीच्या काळात हे मजूर पुन्हा गावाकडे गेल्यामुळे आता शेतकर्यांना मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे आता शेतकर्यांना उपलब्ध मजुरांना वाढीव मोबदला द्यावा लागत आहे. वाढलेली मजुरी व खरिपातील नुकसानीने शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे शेतकर्यांना रब्बी हंगामातील गहू, मका, हरभरा आणि उन्हाळी कांदा यांच्याकडून समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा आहे.