

India tallest Hanuman idol Koradi
नागपूर: नागपूर छिंदवाडा रोडवरील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात तलावाच्या काठावर उभारण्यात येत असलेल्या भारतातील सर्वात उंच 158 फूट उंच वीर हनुमानाच्या भव्य मूर्तीचा पाया महानिर्मितीद्वारे तयार करण्यात आला आहे. मूर्ती पूर्ण झाल्यावर त्यावर आकर्षक 'लेझर प्रोजेक्शन मॅपिंग' आणि तलावामध्ये 'अंडर वॉटर लायटिंग' करण्याचे प्रस्तावित आहे.
यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. परिसराच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणात लँडस्केपिंग आणि 'बटरफ्लाय गार्डन' (फुलपाखरू उद्यान) विकसित केले जाणार आहे. यासाठी ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आला आहे. या परिसरात मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या इमारतीमध्ये हनुमानांच्या जीवनप्रसंग वर्णनावर आधारित एक भव्य संग्रहालय उभारण्याचेही प्रस्तावित आहे.
इमारतीच्या दर्शनी भागात 'ग्लेझिंग'चे काम नासुप्रच्या निधीतून स्वतंत्रपणे केले जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या ठिकाणी पर्यटन आणि इतर उपक्रमांमधून हजारो कुटुंबांना रोजगार मिळेल. याचबरोबर आध्यात्मिक दृष्टीने नागपूर जिल्ह्यातील एक प्रमुख आकर्षण केंद्र म्हणून हे स्थळ महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
कोराडी आता जगदंबा महालक्ष्मी संस्थांसोबत भक्ती व आध्यात्मिक केंद्रासह कौशल्य विकास आणि गौरवशाली भारताच्या ऐतिहासिक पाऊलखुणांना अधोरेखित करणाऱ्या भारत मंडपमसह कौशल्य विकास व महिला सक्षमीकरणाचे एक परिपूर्ण व्यापक संकुल म्हणून नावारूपास येत आहे. मागील काही वर्षांपासून संस्थान परिसरात लहान उपक्रमातून सुरु झालेली सुरुवात आता सुमारे ५०० मुलामुलींच्या निवासव्यवस्थेसह कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून पुढे येईल.
गत काही महिन्यांपासून माविम मार्फत संस्थानने सुरु केलेल्या रेडिमेड गारमेंट क्लस्टरने अनेक महिलांचा आत्मविश्वास वाढविला आहे अगरबत्ती व इतर व्यवसाय व कौशल्य प्रशिक्षणानंतर अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरात नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) आणि नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (NMRDA) यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती त्यांनी दिली. या संपूर्ण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी शासनाने २१४ कोटी ९४ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.