

Nagpur MLC Election Result
नागपूर: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचा आमदार कोण होणार हे दुसऱ्या पसंतीच्या क्रमावरून ठरणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हकालपट्टी केल्यावरही जवळपास २५ हजारांहून अधिक मते घेणारे नितेश कराळे मास्तर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अर्थातच याचा फायदा महाविकास आघाडीचे ॲड. अभिजित वंजारी यांना मिळण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
भाजपचे सुधाकर कोहळे यांची देखील मदार याच मतांवर आहे. ७५,४३८ चा कोटा पूर्ण करायला सुधाकर कोहळे यांना १४,५१४ मते पाहिजे आणि अभिजित वंजारी यांना १८,८०८ मते आणखी पाहिजेत. कराळे मास्तरांची मते २४,२४९ आहेत. ही मते मागे पडणाऱ्या उमेदवारांच्या बाद होण्याच्या टप्प्यात त्यावर असलेल्या दुसऱ्या पसंतीक्रमानुसार संबंधित उमेदवाराला हस्तांतरित होतील.
याव्यतिरिक्त अन्य ३५ उमेदवारांची बाद होणारी ७,९७५ मते आहेत. आतापर्यंत १८ उमेदवारांची मते मोजून झाली आहेत; म्हणजेच २४,२४९ + ७,९७५ = ३२,२२४ मते बाद होणार आहेत. या सर्व मतपत्रिकांवर ज्या उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक मते मिळून जो सर्वप्रथम कोटा पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी होईल. अर्थातच नागपूरचा निकाल कराळे मास्तर आणि त्यांना मिळालेली दुसऱ्या पसंतीची मते ठरवणार असल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.
"माझी मते विजयासाठी निर्णायक ठरणार आहेत. माझी लढाई अस्तित्व सिद्ध करण्यासाठी होती. पक्षाने माझा भोंगा म्हणून वापर केला. पक्षाने जर साथ दिली ती तर चित्र अजून वेगळे असते," असे नितेश कराळे यांनी 'पुढारी न्युज'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तसेच त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
नागपूर पदवीधर मतदारसंघ मतमोजणीत सध्या दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीसह बाद फेरी सुरू आहे. तळाशी असलेले उमेदवार बाद केले जात असून आतापर्यंत 16 उमेदवार बाद करण्यात आले आहे. मात्र, त्यामध्ये अभिजीत वंजारी हे सुधाकर कोहळे यांच्या पेक्षा काही अंशी जास्त मतदान घेऊन ही कोहळे यांची एकूण आघाडी फारशी कमी करू शकलेले नाही. सद्यस्थितीत पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीचे मत मिळून सुधाकर कोहळे यांना 60,945 अभिजीत वंजारी यांना 56,665 मते मिळालेली आहे. त्यामुळे बाद फेरीत 16 उमेदवार बाद ठरल्यानंतर ही सुधाकर कोहळे यांची आघाडी 4280 मतांची आहे. दरम्यान या मतमोजणीचा निर्णय पैलू म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर असलेले नितेश कराळे यांच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी ठरेल