

नागपूर - पवनीवरून नागपूरकडे जाणाऱ्या गोपाला ट्रॅव्हल्स बसने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 डी चक्रीघाट परिसरात अचानक पेट घेतला. इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकला दिसताच त्यांनी बस थांबवून प्रवाशांना खाली उतरविल्याने थोडक्यात प्रवासी बचावले.
अधिक माहितीनुसार रविवारी दुपारी 2.30 वाजता दरम्यान ही घटना घडली.पवनीवरून व्हाया उमरेड नागपूरकडे ही ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 40 वाय 69 04 जात होती. मालक राजश्री गिरीश पांडे रा. उमरेड असून चालक लंकेश नंदलाल पडोळे रा पवनी जिल्हा भंडारा आहेत. हे ट्रॅव्हल्स मध्ये अंदाजे 25 ते 30 प्रवासी प्रवास करीत होते.
उमरेड वरून नागपूरकडे जात असताना ट्रॅव्हल्स डब्ल्यूसीएल हेटी या स्टॉप वरून चक्रीघाट परिसरात पोहोचली त्यादरम्यान इंजिन मधून धूर निघताना दिसला. चालक लंकेश याने ट्रॅव्हल्स रोडच्या बाजूला थांबवली. प्रवाशांना लवकरात लवकर खाली उतरा असे सांगितले. प्रवासी भराभर खाली उतरले.
यानंतर आगीने रुद्र रूप धारण करून पूर्ण ट्रॅव्हल्सला घेरले. काही वेळातच रस्त्यावर वाहनांची रांग लागली. उमरेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनाजी जळक यांच्यासोबत पीएसआय किरण महागावे, राधेश्याम कांबळे, रामेश्वर रावते, पीसी अमित आजबले व अन्य पोलीस पथक घटनास्थळावर पोहोचले त्यांनी डब्ल्यूसीएल व नगरपरिषद उमरेड येथील फायर ब्रिगेडला पाचारण केले.