

Mankapur Bhagwan Birsa Kala Sangam
नागपूर: महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग व भगवान बिरसा कला मंच यांच्या द्वारे आयोजित भगवान बिरसा कला संगम राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या हस्ते झाले. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती दिनानिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिवस अंतर्गत राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवात भगवान बिरसा कला संगम राज्यस्तरीय फेरीचे आयोजन मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले. क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावर पारंपरिक आदिवासी नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, श्रीमती आयुषी सिंह, अपर आयुक्त, आदिवासी विकास नागपूर, प्रगती प्रतिष्ठानचे पुरुषोत्तम आगवण, कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे सचिवप्रशांत बोपर्डीकर, गिरीश गावीत, उदयसिंह पाडवी, अशोक गावीत, जयेश खेवरा, कल्पेश भगतकर, संदीप पाटील, वीरेंद्र चंपानेरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी भगवान बिरसा मुंडा आणि भारत मातेच्या प्रतिमा पूजन झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल कांबळी यांनी केले. संदीप पाटील आणि कमलेश भगतकर यांनी संपादित केलेल्या महान आदिवासी क्रांतिकारकांवरील 'जननायक' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी आदिवासी समाज जल, जंगल, जमीन यांचा रक्षणकर्ता असून देव, दैवत आणि अस्मितेची जपणूक करणारा आहे, आदिवासी संस्कृतीचे जतन संवर्धन करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असेल असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी आदिवासी रूढी परंपरा संवर्धन संस्था, सूर्यदर्शन कैलासवासी मोहनदादा पाडवी संस्था, यशोदीप संस्था, आदिवासी एकता मित्र मंडळ, कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था, महाराष्ट्र नॉलेज सेंटर, प्रगती प्रतिष्ठान या महाराष्ट्रातील संस्थांचा आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक उत्थानाकरिता दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
या राज्यस्तरीय कला संगम राज्यस्तरीय स्पर्धेत पारंपरिक आदिवासी नृत्य स्पर्धेत प्राथमिक फेरीतून विजेते ठरलेल्या 23 संघानी सहभाग नोंदविला. त्यापैकी रवी सातपुते यांच्या संघाने तीन लक्ष रुपयाचे प्रथम पारितोषिक प्राप्त केले. दोन लक्ष रुपयाचे द्वितीय पारितोषिक संदीप मडावी आणि त्यांच्या संघाने प्राप्त केले तर एक लाख रुपयाचे तृतीय पारितोषिक हजरीलाल जवारकर यांच्या संघाने प्राप्त केले. या स्पर्धेचे परीक्षण मारोतराव इचोडकर, ज्ञानेश्वर पवार व रुपेश कोडिलकर यांनी केले.
हस्तकला स्पर्धेत एकूण 20 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला, त्यापैकी प्रथम विजेते नरेश मडावी, व्दितीय शंकर दापट, तृतीय देवराव पारधी ठरले.
चित्रकला स्पर्धेत एकूण 21 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
या चित्रकला व हस्तकला स्पर्धांकरिता परीक्षक म्हणून किशोर सोनटक्के व संजय धात्रक, डॉ. दौलतराव कांबळे यांनी काम पाहिले. प्रथम विजेते सुभाष वळवी, द्वितीय संदीप भोईर, तृतीय गणेश गावीत ठरले.
वादन स्पर्धेत एकूण 20 संघानी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत जगन्नाथ दिलीप व रघुनाथ जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रथम विजेते मनिराम पाडा, द्वितीय नंदू बरतडे, तृतीय नंदू कवटे ठरले.
गायन स्पर्धेत एकूण 22 स्पर्धक सहभागी झाले. परीक्षक म्हणून देवदत्त चौधरी, उदयसिंग पाडवी व हरेंद्र सोष्टे यांनी काम पाहिले. प्रथम विजेते इलमसिंह भागवड्या, द्वितीय प्रभावती नाईक, तृतीय सीता गावंधा ठरले.
सोशल मीडियावरील कंटेंट स्पर्धेत रिल मेकिंग स्पर्धेत मयूर तुमंडा प्रथम, राजू पारधी द्वितीय आणि निकिता सिडाम तृतीय ठरले. फोटोग्राफी स्पर्धेत साजन वाळवी प्रथम, प्रवीण पवार द्वितीय आणि अमित भवरे तृतीय ठरले. शॉर्टफिल्म व डॉक्युमेंटरी या प्रकारात 25 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. दीप्तेश सोनवणे प्रथम, राजेंद्र पवार द्वितीय आणि रोहिदास मोरे तृतीय ठरले. व्लॉग्स स्पर्धेत प्रथम शैलेंद्र कुमार मडावी, द्वितीय अमृता ढोके आणि नयन कांबळी तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले.