

Nagpur BJP ward president murder
नागपूर : भाजप वॉर्ड अध्यक्षांच्या हत्येच्या घटनेला 24 तास होत असताना देखील आरोपींना अटक झालेली नाही. याविरोधात विटा भट्टी कांजी हाऊस परिसरात संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या घटनेनंतर चक्काजाम करण्यात आला.
मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे असताना भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वीटभट्टी परिसरात दिवसाढवळ्या ही हत्येची घटना घडली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सचिन उर्फ सोनू ओमप्रकाश शाहू (वय 40, रा. शाहू मोहल्ला, वृंदावन नगर) असे मृताचे नाव आहे. त्यांचा भंगारचा व्यवसाय होता.
सचिन यांचा मुलगा प्रीत याचा पहिला वाढदिवस असताना त्याच दिवशी पित्याची हत्या करण्यात आली. शनिवारी सायंकाळी नातेवाईक आणि मुलांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. सकाळी भाजपच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी विटाभट्टी चौकातील हॉटेलमध्ये समोसे ऑर्डर दिल्यानंतर दुचाकी वाहनाने घरी जात असताना काही अंतरावर दोन दुचाकीवर चार जण आले. त्यांनी सचिन यांना अडविले. धारदार शस्त्राने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात सचिन खाली कोसळून जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी यापूर्वी घरावर हल्ला झाला. तेव्हा सचिनने केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने मारेकऱ्यांची हिम्मत वाढली व ही घटना घडली असा संताप नागरिकांनी या निमित्ताने व्यक्त केला. यशोधरानगर पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून सचिन उर्फ सोनूने पोलीस उपायुक्ताकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर या गुंडाविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
तेव्हापासून ही मंडळी संधीच्या शोधात होती, अशी माहिती पुढे आली आहे. आम्ही आरोपींची नावे पोलिसांना सांगून देखील त्यांना अटक केली जात नाही. आज दुपारी 12 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला पण कारवाई झाली नाही, असा आरोप सचिनच्या कुटुंबीयांनी केला. आता दुपारी तीन वाजेपर्यंत पोलिसांना वेळ आहे अन्यथा आपण आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे.