

नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात महामार्ग रोखून प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी चांगलीच कोंडी केली आहे. दरम्यान कडू यांच्यासह सहा जणांचे शिष्टमंडळ आज गुरुवारी (दि.३०) मुंबईत आयोजित बैठकीसाठी रवाना होणार आहे. असून तासाभरात ते आंदोलनस्थळी पोहोचत आहेत.
आमदार बच्चू कडू यांचे शेतकरी, दिव्यांगांसाठीच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाविषयी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "मी समाजाचा नेता म्हणून नव्हे, तर एक शेतकरी म्हणून बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी भेट देणार आहे."
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी हे आंदोलन यशस्वी झाले असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने याला समर्थन दिले, असे बच्चू कडू यांनी आज स्पष्ट केले. काल बुधवारी (दि.२९) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्ग मोकळा झाला असला तरी, रात्री झालेल्या पावसामुळे चिखल झालेल्या जागेवरही आंदोलकांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. आज मुंबईत होणारी चर्चा यशस्वी न झाल्यास उद्या, शुक्रवारी (31 ऑक्टोबर) रोजी नागपुरात रेल्वे रोखण्यावर आंदोलक ठाम आहेत. हे आंदोलन राज्यभर तीव्र होण्याची शक्यता आहे.
मुंबईला जाणाऱ्या शिष्टमंडळात राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपकर, वामनराव चटप आदींचा समावेश असणार आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोण जाणार याचा अंतिम निर्णय लवकरच एका बैठकीत घेतला जाईल, असे बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आज मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या निकालाकडे आंदोलकांसह गेल्या तीन दिवसांपासून कोंडीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.