

Bachchu Kadu Controversial Statement :
प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त करताना एक अत्यंत वादग्रस्त आणि भडकाऊ आवाहन केले आहे. आत्महत्या करण्याऐवजी थेट एखाद्या आमदाराला कापून टाकण्याचा किंवा सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र होऊन आंदोलन करण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
शेतकरी हक्क परिषदेमध्ये बोलताना बच्चू कडू यांनी कापूस आणि इतर शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावावरून (उदा. ३,००० रुपये) तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी शेतकऱ्यांना टोचून विचारले, "आपला कापूस ३,००० ला विकावा लागला तर काय कराल तुम्ही? सगळी शांत, आत्महत्या! अरे, तू मरण्यापेक्षा एखाद्याला मारून टाक ना! एखादा आमदार तरी कापला का?"
यावेळी त्यांनी आंदोलनाची आणखी एक सीमा ओलांडणारी पद्धत सांगितली. ते म्हणाले, "आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं. कपडे ठेवायचे नाही आणि घराच्या समोर जाऊन उट. काय फस मेल्यापेक्षा परवडत नाही का? हा धिंगाना जर सुरू केला ना, तर सांगतोय..."
आपल्या वक्तव्यावर होणाऱ्या संभाव्य टीकेची पर्वा न करता, बच्चू कडू यांनी स्वतःवरील गुन्ह्यांचा उल्लेख केला. "माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत चार कलेक्टर आडवे केले, तीन सचिव मंत्रालयात ठोकले, काय फरक पडला? करून काय करणार आहेत?" असा संताप त्यांनी व्यक्त केला.
बच्चू कडू यांच्या या विधानावर इतर राजकीय नेत्यांनी आणि टीकाकारांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. सिरसाट यांनी "शेतकरी त्याच्या अडचणीत आहे, त्याला खून करायला लावणार का? ही पद्धत असते का काही? सरकारने याच्यावर गंभीरपणे विचार करायला हवा." अशी टीका केली.
एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी बच्चू कडू यांनाच आव्हान दिले, "शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करा मग तुम्ही करा ना! शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील. ते स्टेटमेंट फक्त प्रसिद्धीसाठी असतात आणि त्याला काही अर्थ नसतो."
नितेश राणेंनी बच्चू कडू यांच्यावर प्रसिद्धीसाठी अशी विधाने करत असल्याची टीका केली. "बच्चू कडूला जरा वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते आहे," असे खोचक मत व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, बच्चू कडू यांनी हे वक्तव्य त्यांच्या सरकारमध्ये असूनही शेतकऱ्यांसाठी बोलत असल्याचे स्पष्ट केले. या विधानामुळे त्यांच्यावर कोणती कायदेशीर कारवाई होते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.