

Dr Babasaheb Ambedkar College Nagpur Professors Salary Stopped
नागपूर: शिक्षण सहसंचालकाकडे दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या वरिष्ठ प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रस्ताव पाठवून २० दिवस झालेत. मात्र, अजूनही ८१ प्राध्यापकांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले नाही. त्यांचे वेतन थांबविण्याचे कारण काय, असा संताप डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. दीपा पान्हेकर या डॉ. आंबेडकर कॉलेजच्या कार्यकारी प्राचार्य होत्या. मात्र, त्यांना पुढील काळासाठी विद्यापीठाची मान्यता मिळाली नाही. त्यानंतर, ७ जुलै रोजी डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांनी कार्यकारी प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला. मात्र, त्यांनी प्राचार्य कक्षात बेकायदेशीरपणे प्रवेश करून हा कार्यभार स्वीकारला होता, अशी टीका भन्ते सुरई सुसाई यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी डॉ. पान्हेकर या पुन्हा एकदा प्राचार्य कक्षात गेल्या.मात्र, आजघडीला डॉ. मेहरे किंवा डॉ. पान्हेकर या दोघींकडेही कार्यकारी प्राचार्यपदाची जबाबदारी नाही. त्यामुळे, डॉ. आंबेडकर कॉलेज हे प्राचार्याविना सुरू आहे. सध्या अनेक विद्यार्थ्यांचे निकाल लागले आहेत. अनेकांना पुढील प्रवेशही घ्यायचे आहेत. त्याकरिता, विद्यार्थी प्रमाणपत्रांवर प्राचार्यांच्या सह्या घेण्यासाठी येत आहेत. मात्र, प्राचार्यच नसल्याने या विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा गुंता लवकरात लवकर सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. आंबेडकर महाविद्यालय व्यवस्थापनाने डॉ. दीपा पान्डेकर यांना 'कार्यकारी प्राचार्य' म्हणून मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव १६ जून रोजीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे सादर केला. मात्र, विद्यापीठाने ३ जुलै रोजी प्रस्तावातील त्रुटी दाखविणारे पत्र महाविद्यालयाला पाठविले. त्यावर महाविद्यालय व्यवस्थापनाने आवश्यक त्रुटींची पूर्तता करीत सुधारित प्रस्ताव ६ जुलै रोजी पुन्हा विद्यापीठाकडे सादर केला.
प्रस्तावात जर त्रुटी होती तर विद्यापीठाने ते महाविद्यालयाला कळविण्यास विलंब का केला, असा सवाल सुरेई ससाई यांनी उपस्थित केला आहे. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा हा प्रयत्न काही जण करीत आहेत. विद्यापीठाने संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कार्यकारी प्राचार्यपदाच्या मान्यतेबाबत तातडीने निर्णय घ्यावा. तसेच दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी केली.