

Illegal Hookah Bar Nagpur
नागपूर : नागपूर शहरातील अवैध हुक्का पार्लरविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून, वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी परिसरात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश करण्यात आला. उमरेड रोडवरील ‘टेक्सास स्मोकिंग शॉपी’वर विशेष पथकाने मध्यरात्रीनंतर छापा टाकत रोकड आणि हुक्क्याच्या साहित्यांसह एकूण ९४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दिघोरी येथील या शॉपीमध्ये कोणतीही वैध परवानगी नसताना ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पुरविला जात होता. या माहितीची खातरजमा केल्यानंतर विशेष पथकाने मध्यरात्री सुमारे अडीच वाजता पंचांसमक्ष शॉपीवर छापा टाकला.
कारवाईदरम्यान शॉपीचा व्यवस्थापक ओंकार संदीप मडावी हा ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का उपलब्ध करून देताना आढळून आला. पोलिसांनी परवानगीबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतीही वैध परवानगी आढळून आली नाही. चौकशीत सदर शॉपीचा मालक अविनाश पर्वतलाल पांडे असल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी शॉपीची झडती घेतली. यामध्ये ३८ हजार १०० रुपयांची रोकड, विविध आकारांचे हुक्का पात्र, नळ्या, विविध स्वादांचे तंबाखूजन्य पदार्थ तसेच हुक्क्यासाठी वापरण्यात येणारे अन्य साहित्य आढळून आले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ९४ हजार २४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी शॉपीचा मालक अविनाश पांडे आणि व्यवस्थापक ओंकार मडावी यांच्याविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांनुसार वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शॉपीमध्ये हा अवैध हुक्का व्यवसाय किती काळापासून सुरू होता, तसेच या व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.