

Juvenile Escape Nagpur
नागपूर : नागपूर येथील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणकर चौक येथील रिमांड होममधून चार अल्पवयीन आरोपी खिडकी तोडून फरार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. फरार आरोपींमध्ये सुमारे दोन महिन्यांपूर्वी कामठी येथे झालेल्या हत्याकांडातील आरोपीचाही समावेश असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, यातील एका आरोपीला पुण्यातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणकर चौक येथील रिमांड होममध्ये कामठी हत्याकांडासह सदर आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांतील अल्पवयीन आरोपींना ठेवण्यात आले होते. फरार झालेल्या आरोपींपैकी एका आरोपीला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी पिस्तूल बाळगल्याच्या प्रकरणात ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला नागपुरातील रिमांड होममध्ये आणण्यात आले होते.
शनिवारी रात्री चारही अल्पवयीन आरोपींनी रिमांड होममधून पलायन करण्याचा कट रचला. लघुशंकेसाठी स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा करून ते तेथे गेले. त्यानंतर स्वच्छतागृहातील खिडकी तोडून त्या मार्गाने बाहेर पडले आणि वेगवेगळ्या दिशेने पळून गेले.
घटना लक्षात येताच रिमांड होम प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. कपिलनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. तपासादरम्यान एका आरोपीचा ठावठिकाणा पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक पुण्याला रवाना झाले आणि संबंधित आरोपीला ताब्यात घेतले.
उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. फरार होण्याच्या घटनेमागील कारण तसेच त्यांना बाहेर पडण्यासाठी कोणी मदत केली का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी एका आरोपीला पुण्यातून ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.