

नागपूर - नागपूर महानगरपालिकेद्वारा भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील दहा एकर जागेवर भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीद्वारे नवीन घनकचरा कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. या माध्यमातून पाचशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या केंद्रासाठी देण्यात आलेल्या जागेची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शनिवारी पाहणी केली.
या प्रकल्पाद्वारे दररोज ५०० हून अधिक मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. शहरात दररोज १३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. यापैकी सध्या ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीद्वारे ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. परिणामी भांडेवाडी परिसरात दिसणारे कचऱ्याचे ढिगारे कमी होऊन जागा मोकळी होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी आगीच्या घटनांनी भांडेवाडी डम्पिंग यार्ड चर्चेत आले होते.
विशेष म्हणजे, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीला येत्या पाच वर्षांसाठी करारबद्ध करण्यात आले असून, याद्वारे प्रक्रिया केल्या जाणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती व आरडीएफ तयार केले जाणार आहे. पुणे येथील भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून येत्या डिसेंबर महिन्यापासून प्रक्रिया केंद्रात पूर्ण क्षमतेने कार्य सुरू केले जाणार आहे. आयुक्तांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.