

नागपूर: मराठी रोडवरील मानकापूर परिसरात आज शुक्रवारी (दि.१२) पुन्हा एक भीषण अपघाताची घटना घडली. सुदैवाने सर्व विद्यार्थी सुखरूप बचावले. भवन्स कोराडी स्कूलची व्हॅन आणि नारायणा शाळेतील स्कूल बसमध्ये हा अपघात झाला. यावेळी चालकासह 1 मुलगा गंभीर जखमी झाला असून, 8 मुले किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे.
नागरिकांनी जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ॲम्ब्युलन्स, पोलिस येण्यास उशीर झाल्याने लोक संतापले होते. मानकापूर रोडवर, नागपूर कल्पना टॉकीज चौकाजवळ ही घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून मानकापूर उड्डाणपूल परिसरात सतत अपघात होत आहेत. मात्र ना संबंधित कंत्राटदार ना सरकार लक्ष देत आहे.
या अपघातानंतर नॅशनल हायवे अॅथोरिटी आणि महाराष्ट्र सरकारचा यावेळी नागरिकांनी निषेध केला. भवन्स स्कूलच्या बसच्या अपघातात मुले जखमी झाल्याने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे. कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्याची, लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.