

नागपूर : पर्यावरणासाठी घातक असलेल्या जलपर्णीच्या विळख्यातून अंबाझरी तलाव मुक्त करण्यात मनपाच्या घनकचरा विभागाला यश येत आहे. पर्यावरणासाठी घातक असलेल्या या जलपर्णी अंबाझरी तलावावर पसरली होती.
शहरातील या ऐतिहासिक तलावाची जलपर्णीच्या विळखत्यातून मुक्तता करण्यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त अंकित यांच्या नेतृत्वात मोहिमेला सुरूवात झाली होती. तसेच नगरसेवक योगेश पाचपोर यांच्यासह इतर नगरसेवकांनी देखील या मोहिमेसाठी पाठपुरावा केला.
नव्या तंत्राचा वापर करून जलपर्णी निर्मूलनाची मोहिम राबवावी, असे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले होते. जलपर्णीला घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने शक्य नसल्याने मनपाने वीड हार्वेस्टरची मदत घेतली. वीड हार्वेस्टर तलावाच्या मध्यभागी असलेल्या जलपर्णीला काठावर आणणे शक्य झाले. जवळपास तीन महिन्यांपासून ही मोहिम सातत्याने सुरू होती.
जलपर्णी समूळ नष्ट करू ; महापौर
पर्यावरणासाठी घातक असलेल्या जलपर्णीचे समूळ नष्ट करण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असून घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलेले हे काम प्रशंसनीय असल्याची प्रतिक्रिया महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी व्यक्त केली.