नागपूर : अंबाझरी तलावात पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू

File Photo
File Photo
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील अंबाझरी तलावात पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंबाझरी तलावात दूषित पाणी, पाण्याची वाढती पातळी, कुंपण नसल्याने वाढते धोके आणि पोहण्यास पाणी अयोग्य असल्याने बुडून मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडतात. तरीही जीव धोक्यात घालून लोक पाेहायला उतरून हकनाक जीव गमावतात. रविवारीही अशा घटनेत दोघांचा जीव गेला.

परंतु, हा मृत्यू आकस्मिक नसून ढिम्म प्रशासनाने घेतलेले बळी असल्याची चर्चा होत आहे. मिहिर शरद उके (१९, इंदोरा) आणि चंद्रशेखर किशोर वाघमारे (२०, लष्करीबाग) अशी तलावात बुडून मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत.

अंबाझरी तलाव हा मृत्यूचा सापळा ठरत असल्याबाबत माध्यमांनी वारंवार लक्ष वेधूनही स्थानिक प्रशासन ढिम्म आहे. अंबाझरी तलावाला कुंपण नसल्यामुळे फिरायला येणाऱ्या प्रत्येकाला थेट पाण्यात उतरता येते. तसेच अंबाझरी तलावात काही संघटनांना मुलांना पोहण्यास शिकवण्याची परवानगीसुद्धा महापालिकेने दिली आहे. अंबाझरीचे दूषित पाणी आणि पाण्याची पातळी बघता तलावात पोहण्याची परवानगी देण्याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतेही गांभीर्य दाखवले नाही, हे विशेष.

पाण्यात अन्य शिकाऊ मुले पोहताना पाहून अनेकांंना पोहण्याचा मोह आवरता येत नाही. त्यामुळे तलावात पोहता येत नसतानाही फिरायला येणारे आकर्षणापोटी पाण्यात उड्या घेतात. तेथेच त्यांचा घात होतो. पाण्याची वाढती पातळी बघता खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. रविवारी दुपारी बारा वाजता मिहीर उके, चंद्रशेखर वाघमारे, अक्षय मेश्राम आणि बंटी हे चौघेही अंबाझरी तलावावर फिरायला आले होते. चौघेही वर्गमित्र असून रविवारची सुटी अंबाझरीवर घालवण्याच्या तयारीत आले होते. मिहीर उके याने पाण्यात पोहण्यासाठी अन्य तिघांना प्रोत्साहन दिले.

मिहीरने सर्वप्रथम पाण्यात उडी घेतली. काही वेळात तिघेही मित्र पाण्यात उतरले. परंतु, मिहीर खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. त्याने चंद्रशेखरला 'वाचवा…वाचवा…' असा आवाज दिला. त्याने मित्राला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. दोघांनाही पोहणे येत नसल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. एकाने अंबाझरी पोलिसांना आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली. तासाभराच्या मेहनतीनंतर दोनही तरुणाचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news