

नागपूर : देशभरात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी यामुळे हवाई वाहतूक पुरती विस्कळीत झाली आहे. खराब हवामानाचा मोठा फटका विमान प्रवाशांना बसत असून, गेल्या २४ तासांत तब्बल चार विमानांना नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने उतरवावे लागले आहे.
शुक्रवारी रात्री बेंगळुरूहून हैदराबादकडे जाणाऱ्या इंडिगोच्या ६ई ६३८ (6E 638) या विमानाला खराब हवामानाचा सामना करावा लागला. वेळापत्रकानुसार हे विमान संध्याकाळी ७:४५ वाजता हैदराबाद येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, तिथे सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी हवामानामुळे धावपट्टीवर विमान उतरवणे अत्यंत जोखमीचे होते. अखेर, हैदराबाद एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) सुरक्षेचा उपाय म्हणून हे विमान तात्काळ नागपूरकडे वळवण्याचा (डायव्हर्ट करण्याचा) निर्णय घेतला.
नागपूर विमानतळावर विमान वळवण्याची ही गेल्या २४ तासांतील चौथी घटना आहे. याआधी गुरुवारी रात्री रायपूरमधील खराब हवामानामुळे तीन वेगवेगळ्या विमानांना नागपुरात उतरवावे लागले होते. यामध्ये खालील विमानांचा समावेश होता:
एअर इंडिया: दिल्ली ते रायपूर
इंडिगो: दिल्ली ते रायपूर
इंडिगो: हैदराबाद ते रायपूर
विमान कंपन्यांचे प्रवाशांना आवाहन
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहणार असल्याने विमान प्रवासाच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर निघण्यापूर्वी आपल्या फ्लाईटचे स्टेटस (Flight Status) नक्की तपासून घ्यावे, असे आवाहन विमान कंपन्यांकडून करण्यात आले आहे.