

Nagpur ATC Emergency
नागपूर : दुपारी बाराची वेळ. नागपूर विमानतळावर दुपारच्या किशनगड, गोवा, बेंगलोर, मुंबई विमानासाठी प्रवाशांची वर्दळ सुरु होते. या धावपळीच्या वेळेत एटीसी विभागाला शॅडो फिनिक्स एअरलाईन्स (डमी नाव) च्या पायलटचा संदेश येतो. विमानातील फ्यूअल संपत आल्याने रिफिलिंगसाठी तातडीने आम्हाला उतरण्याची परवानगी द्या, सदर विमानाला उतरण्याची परवानगी दिली जाते. विमान सुखरुप उतरते. उतरल्यावर हे विमान रिफिलिंगसाठी नव्हे तर हायजेक करण्यात आलेले असल्याचे स्पष्ट होते.
मग साऱ्या सुरक्षा यंत्रणाची कसोटी सुरू होते. विमानचालकाकडून हायजॅकबाबत पुष्टी मिळताच विमानतळाचे वरीष्ठ संचालक आबिद रुही हे एरोड्रम समितीचे अध्यक्ष तथा पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्याशी तात्काळ संपर्क साधतात. समितीतील इतर प्रमुख सदस्यांची काँन्फरन्स कॉलद्वारे अवघ्या मिनीटात पहिली बैठक होते. सर्वजन विमानतळाच्या सुरक्षा सभागृहात पोहोचतात. यात मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सराटकर, सीआयएसएफचे वरीष्ठ कमांडट दिलीपकुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी राठोड, वायुदलाचे विंग कमांडर विनित मडवाडकर, पोलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांचा प्रामुख्याने समावेश होता.
विमानातील अतिरेकी हे पायलटच्या मदतीने संवाद यंत्रणेवर ताबा मिळवतात. त्यांची पहिली मागणी असते पाच हजार करोड रुपये व एक हेलिकॉप्टर. एवढी मोठी रक्कम तात्काळ आणायची कोठून याची खलबते एरोड्रम समितीतील सदस्यांमध्ये सुरु होते. रिझर्व बँकेकडे या रकमेबाबत विचारणा केली जाते. दुसऱ्या बाजुला सुरक्षा सभागृहात बसविण्यात आलेल्या दूरदृष्यप्रणालीद्वारे विमानतळावर लावण्यात आलेल्या छुप्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने हायजॅक झालेल्या विमानाकडे सर्व सुरक्षा यंत्रणा डोळे रोखून बसते. विमानातील अतिरेकी आपल्या मागण्यांवर अडून बसतात. आता तीन पातळीवर नियोजन केले जाते. रनवेवरील सुरक्षा, अतिरेक्यांशी वाटाघाटी, प्रवासी जखमी झाल्यास त्यांच्या उपचारासाठी सुविधा आणि हायजॅक झालेल्या विमानावर सुरक्षा यंत्रणेद्वारे ताबा मिळविण्यासाठी रणनिती!
दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु असलेली ही कारवाई व वाटाघाटी शेवटच्या निर्णायक स्थितीवर पोहोचते. येथे राष्ट्रीय सुरक्षा गार्डची भूमिका व कर्तव्य पार पाडण्यासाठी सीआयएसएफचे जवान व अधिकारी विमानाला सुरक्षित घेराव टाकतात. वाटाघाटीचा दुवा म्हणून काही निवडक जवान वेश बदलून विमानात प्रवेश मिळवतात आणि क्षणाचाही विलंब न करता सर्व सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेतून आपल्या केलेल्या योजनेनुसार प्रवासांना अतिरेक्यापासून सुरक्षित करतात.
अशा हायजॅक असलेल्या विमानांना सुरक्षितरित्या हाताळण्यासाठी देशातील जी बारा निवडक विमानतळ आहेत त्यापैकी नागपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एक असल्याचे विमानतळाचे वरीष्ठ संचालक आबिद रुही यांनी सांगितले. संबंधित आपत्कालीन परिस्थितींना प्रतिसाद देताना सर्व संबंधित यंत्रणांची कार्यक्षमता, तत्परता आणि समन्वयाची चाचणी घेणे व त्यात अधिक बळकटी आणणे हा याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.