

Nagpur University Women Players Harassed Train
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महिला कराटे खेळाडूंवर 'फलकनुमा एक्सप्रेस'मध्ये झालेल्या छेडछाडीच्या घटनेने संपूर्ण क्रीडा क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. तिवारी यांच्या सूचनेनुसार व भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे यांच्या मार्गदर्शनात, युवती प्रमुख प्रशंसा भोयर यांनी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. संभाजी भोसले यांना निवेदन सादर करून दोषींवर कडक कारवाई करण्याची आणि भविष्यात खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली बनविण्याची मागणी केली.
यावर डॉ. संभाजी भोसले यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य पावले उचलण्याचे व खेळाडूंच्या सुरक्षेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.नागपूर विद्यापीठाचा १०-१२ मुलींचा कराटे संघ ओडिशामधील बालासोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गेला होता. रविवारी सकाळी भुवनेश्वर रेल्वे स्थानकावरून बालासोरकडे जाण्यासाठी या मुलींनी 'फलकनुमा एक्स्प्रेस' (गाडी क्रमांक १२७०४) पकडली. दुर्दैवाने, विद्यापीठ प्रशासनाच्या नियोजनाअभावी महिला व पुरुष प्रशिक्षक दुसऱ्या बोगीमध्ये होते आणि खेळाडू मुली वेगवेगळ्या डब्यांमध्ये विखुरलेले होते.
याच संधीचा फायदा घेत काही उनाड तरुणांच्या टोळक्याने या खेळाडू मुलींची छेड काढली, त्यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य भाषेत शेरेबाजी केली आणि अश्लील वर्तन केले. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत या मुलींनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी व्हिडिओ बनवून आपल्या पालकांना पाठवला, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे रेल्वे प्रशासनालाही निवेदन देण्यात आले असून दोषींवर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. "पीडित विद्यार्थिनी नागपूर विद्यापीठाच्या खेळाडू असल्याने त्यांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी विद्यापीठाची आहे," असे मत प्रशंसा भोयर यांनी व्यक्त केले.
रेल्वेत मुलींची छेडछाड करणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्यासाठी विद्यापीठाने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करावा.राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील संघ प्रवासाला निघताना विद्यार्थिनी व प्रशिक्षक यांना एकाच डब्यामध्ये आरक्षण मिळावे, ही व्यवस्था कायमस्वरूपी लागू करावी जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.
या घटनेमुळे खेळाडू आणि पालकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी विद्यापीठाने चौकशी समिती नेमून ठोस उपाययोजना कराव्यात.भविष्यात खेळाडूंना अशा प्रकारचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी विद्यापीठाने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी भाजयुमोच्या वतीने करण्यात आली. क्रीडा संचालक डॉ. संभाजी भोसले यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले व विद्यापीठ या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वस्त केले.
यावेळी युवती मोर्चाच्या अनुश्री कापसे,श्रद्धा धवळे,मोनाली चुटे,मुस्कान शाहू,प्रबोधिनी गायकवाड,श्रुती धोळे,भाग्यश्री महाडिक,रश्मी श्रीवास,आरुषी सिंगांधुपे,पल्लवी गिरोले,मीनल गहलोत,कल्याणी कुबडे इत्यादी उपस्थित होते.