Nagpur Robbery | नागपुरात ४० लाखांच्या दरोड्याचा सात दिवसांत छडा; उत्तर प्रदेशातून चार संशयित ताब्यात

३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी; फॉर्च्युनर कार जप्त
Crime
CrimePudhari
Published on: 
Updated on: 

Nagpur Interstate Gang Robbery

नागपूर : बंदुकीसारख्या वस्तूचा धाक दाखवून सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानातून सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून परराज्यात पलायन करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा रोड परिसरात ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या या दरोड्याच्या तपासासाठी पोलिसांनी ३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक माहितीच्या आधारे सात दिवस शोधमोहीम राबवून उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली फॉर्च्युनर कारही जप्त करण्यात आली असून, इतर साथीदारांचा आणि लुटलेल्या मुद्देमालाचा शोध सुरू आहे.

अवघ्या १५ मिनिटांत दुकानावर दरोडा

३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान हिंगणा रोडवरील महाकाली बारसमोरील परिसरात ही घटना घडली. फिर्यादी राकेश सुभाष धोमणे (वय ३९) यांचे गजानन नगर परिसरात सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीचे दुकान आहे. घटनेच्या वेळी दुकानात काम करणारा शुभम खेमराज हाडो (वय २४) उपस्थित होता.

Crime
Nagpur News | नागपूरच्या ग्रीन फार्ममध्ये कथित अश्लील नृत्याचा प्रकार; २६ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल!

याचवेळी चार अनोळखी इसम दुकानात शिरले. त्यांनी बंदुकीसारख्या दिसणाऱ्या वस्तूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि सुमारे ३५० ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने व अंदाजे ४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

 ३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांसह गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळ आणि परिसरातील ३०० ते ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक माहिती, संशयितांच्या हालचाली आणि परिस्थितिजन्य पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.

Crime
Nagpur News | प्रामाणिकपणाचे दर्शन! रस्त्यावर आढळलेली १५ हजारांची रोकड वयोवृद्धाने केली परत

तपासाचे धागेदोरे उत्तर प्रदेश आणि हरियाणापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांची दोन पथके संबंधित राज्यांत रवाना करण्यात आली. स्थानिक पोलिसांची मदत घेत संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. अखेर सात दिवसांच्या प्रयत्नांनंतर उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

उत्तर प्रदेशातील चार संशयित ताब्यात

या प्रकरणात अभिषेकसिंग ठाकूर (रा. बरेली, उत्तर प्रदेश), जयराम ऊर्फ जोगिंदर अशोकसिंग ठाकूर (वय १९), शुभांकित निलेशकुमार चतुर्वेदी (वय २२, रा. नोएडा, उत्तर प्रदेश) आणि राजन सामी शर्मा (वय २२, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या चौघांची गुन्ह्यातील भूमिका आणि इतर संभाव्य धागेदोरे तपासले जात आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोधही सुरू आहे.

 फॉर्च्युनर कार जप्त; मुद्देमालाचा शोध सुरू

तपासादरम्यान गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली फॉर्च्युनर कार (एमएच ४९ बीव्ही ११९१) पोलिसांनी जप्त केली आहे. लुटलेल्या दागिन्यांची विल्हेवाट कशी लावण्यात आली, या टोळीचे आणखी कोणत्या गुन्ह्यांशी संबंध आहेत का आणि दरोड्याच्या कटात इतर कोणाचा सहभाग होता, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

Crime
Nagpur News : फॉरेस्ट ऑफिस चौक ते आरबीआयकडे जाणारा ८० मीटर रस्ता बंद करण्याचा प्रस्ताव

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक चेतन बोरखडे यांच्यासह पोलीस कर्मचारी नितीन चुलपार, राजाराम जाधव, विवेक झिंगरे, अर्जुन यादव, कमलेश गणोर, मनोज टेकाम, प्रितम यादव, रितेश तुमडाम, योगेश वासनिक, महेंद्र सडमाके, नितीन वासनिक, चंद्रशेखर रघोते, अनंता क्षीरसागर, पराग ढोक, रोशन तिवारी, नितीन वर्मा, कमलेश गहलोद, संदीप पांडे, सुधीर पवार, कुणाल गोडाम, धिरज पंचभावे, मिथुन नाईक, चैतन्य, परमेश्वर, आशिष धंदरे आणि अजमत शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news