

नागपूर: येथील विधानभवन विस्तारीकरणाच्या कामासाठी महानगरपालिकेच्या त्रिकोणी जागेला लागून असलेल्या मार्गावरील ८० मीटर लांबीचा रस्ता बंद करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या कामादरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याने वाहनधारकांना व नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण किंवा गैरसोय होणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
झिरो माईल ते फॉरेस्ट ऑफिस चौक: या मार्गावर वाहतूक नेहमीप्रमाणे पूर्ववत सुरू राहील.
फॉरेस्ट ऑफिस चौक ते आरबीआय मार्ग: विधानभवन विस्तारीकरणाच्या बांधकामासाठी केवळ फॉरेस्ट ऑफिस चौकाकडून आरबीआयकडे जाणारा ८० मीटर लांबीचा भाग बंद करण्याचा प्रस्ताव आहे. या ८० मीटरचा भाग वगळता अन्य सर्व मार्गांवर वाहतूक सुरळीत सुरू राहील.
शासकीय मुद्रणालयाच्या (गव्हर्नमेंट प्रेस) गेटसमोरील मार्गाने बीएसएनएलच्या दिशेने जाणारा मार्ग खुला राहील. त्यामुळे झिरो माईलकडून येऊन बीएसएनएलकडे जाणारी वाहने शासकीय ग्रंथालय (लायब्ररी) समोरील मार्गावरून संविधान चौक व आरबीआयकडे सहजपणे जाऊ शकतील.
भारतीय विद्या भवनकडून येणारी वाहने: भारतीय विद्या भवनकडून आरबीआयच्या दिशेने जाणारी वाहने झिरो माईल, विधानभवन चौक ते आरबीआय चौकाच्या मार्गाने सहजपणे मार्गक्रमण करू शकतील.
विस्तारीकरणाच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुरेशा पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात असल्याचे एमएसआयडीसीने स्पष्ट केले आहे