

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. खऱ्या अर्थाने लोककल्याणाचा विचार महाराजांचा होता. एकप्रकारे छत्रपती शिवराय हे लोकशाहीचे जनक आहेत, असे प्रतिपादन खा. उदयनराजे भोसले यांनी केले. चंद्रपूर येथे आज (दि.१९) शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला आले असता त्यांनी नागपुरातील माध्यमांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी यांनी विकास गावोगावी पोहचविला आहे. विदर्भ, महाराष्ट्रासह आणि देशभरात विकास पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण दुसरा विचार करणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार का? यासंदर्भात छेडले असता इच्छा कुणाचीही असते, तुमची काय आहे? लोकशाही आहे, सर्वांना अधिकार आहे. श्रीनिवास पाटील वयाने वडीलधारी व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाची इच्छा असते. यात अपवाद नाही, असा सावध पवित्रा घेतला.
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना त्याकाळात मंडळ आयोगातून चूक झाली. आरक्षण फक्त मागासवर्गाला न देता, कुठल्याही जाती- धर्मातील व्यक्ती असू दे जो आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, त्यांना मदत करण्याचा विचार हवा होता. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी भर दिला. यासोबतच शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छाही दिल्या.
हेही वाचा :