

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक ९ मधील मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटाला लावली जाणारी शाई लगेच पुसली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर प्रकारामुळे मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांनी संताप व्यक्त करत निवडणूक प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटल्यानंतर त्याच्या बोटावर लावली जाणारी 'अविभाज्य' शाई ही बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी महत्त्वाची असते. मात्र, पॅनल क्रमांक ९ मध्ये ही शाई लावल्यानंतर काही क्षणातच पुसली जात असल्याचे दिसून आले. हा प्रकार समोर येताच केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांनी तातडीने मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडे धाव घेत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. "अशा प्रकारचे घोळ होणार असतील, तर निवडणुका घेता कशाला?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, या तक्रारीला काँग्रेसच्या उमेदवार माधवी चौधरी यांनीही दुजोरा दिला असून प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.